औरंगाबाद : महानगरपालिका प्रशासनाने शहरातील विविध वॉर्डात बांधलेले व्यापारी गाळे अनेक वर्षापासून पडून आहेत. उत्पन्न वाढीच्या दृष्टीने 112 गाळे भाडे तत्त्वावर देण्यासाठी मनपा प्रशासनाने निविदा काढली आहे.
महानगरपालिकेने शहरातील मनपाच्या मालकीच्या जागावर व्यापारी संकुल उभारलेले आहेत. या व्यापारी संकुलातील गाळे भाड्याने देऊन उत्पन्न वाढविण्यासाठी मनपाने गाळे बांधलेले आहेत. पण काही ठिकाणी मनपाने बाजारपेठेतील भाड्यापेक्षा जादा भाडे आकारल्याने नागरिक हे गाळे भाड्याने घेत नाहीत. त्यामुळे शहरातील विविध भागात जवळपास 112 गाळे रिकामे आहेत. पैठण गेट येथील लोकमान्य टिळक व्यापारी संकुलात 20 गाळे, रेल्वे स्टेशन येथील संत गाडगेबाबा व्यापारी संकुल 22 गाळे, गुलमंडी येथील भालेश्वर मार्केटमध्ये 17 गाळे, औरंगपुरा येथील पिया मार्केटमध्ये 19 गाळे, नेहरूभवन येथे 2, कबाडीपुरा 2, जय टॉवर्स 2, एकनाथनगर 13, हर्षनगर3, संजयनगर, बायजीपुरा 2 व चिकलठाणा येथील 1 हॉल असे 112 गाळे भाड्याने देण्यात येणार आहेत. हे गाळे भाड्याने गेल्यास मनपाच्या उत्पन्नात दरवर्षी आर्थिक वाढ होणार आहे.